जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या पाच तगड्या निर्णयांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. या घावांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने तातडीने प्रत्युत्तर देत सहा कठोर घोषणा केल्या आहेत. भारत-पाक संबंध आता अधिकच तणावपूर्ण वळणावर पोहोचले असून, दोन्ही देशांमध्ये थेट धोरणात्मक संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे.
भारताचे 5 तगडे निर्णय
पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचे बळी गेल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात खालील निर्णय घेतले:
- सिंधू जल करार तात्पुरता स्थगित
- पाक नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ बंद
- 48 तासांत पाक नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश
- अटारी-वाघा सीमेवर वाहतूक व व्यापारी हालचाल 1 मेपर्यंत बंद
- दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय
पाकिस्तानचा पलटवार
भारताच्या निर्णयांना उत्तर म्हणून पाकिस्ताननेही खालील घोषणांची बरसात केली:
- भारतासोबतचा सर्व व्यापार तात्काळ बंद
- सार्क व्हिसा सुविधेतून भारतीय नागरिकांना वगळणार
- भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना परत पाठवणार
- वाघा अटारी बॉर्डर तातडीने बंद
- इस्लामाबादमध्ये कार्यरत भारतीय राजनैतिक अधिकारी फक्त ३०
- भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद
मोदींचा इशारा
बिहारच्या मधुबनी इथे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा हल्ला भारतीय आत्म्यावर हल्ला होता. दहशतवाद्यांनी जे दुःसाहस केलं त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. आता त्यांची प्रत्येक आश्रयस्थाने उद्ध्वस्त होतील.”
भारत आणि पाकिस्तानमधील हे टोकाचे निर्णय फक्त राजनैतिक नाहीत, तर सामरिक व आर्थिक परिणामांसह एक नव्या संघर्षाच्या शक्यतेकडे नेत आहेत. पहलगामच्या घटनेने केवळ देशाला हादरवलं नाही, तर दहशतवादाला थेट उत्तर देण्याची भारताची भूमिका अधिक आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.




