पंतप्रधान असताना तुम्ही काय केलं? पवारांवरील टीकेनंतर राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर, “तुम्ही पंतप्रधान असताना काय केले?” असा सवाल नरेंद्र मोदींना विचारला आहे.

सामनाच्या अग्रलेखात मोदींवर टीका करत राऊतांनी म्हटले आहे की, “मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली. मोदींच्या सरकारने ही कर्जे माफ केली, पण शेतकऱ्यांच्या पाच-दहा हजारांच्या कर्जासाठी त्यांच्या घरांवर टाच आली. भाजपास पैसे देणाऱ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवून परदेशात पलायन केले. हे मोदींच्या राज्यात घडत आहे. अनेक प्रतिष्ठत लोक, व्यापारी या देशात राहणे नको म्हणून वैतागून दुसऱ्या देशात पलायन करीत आहेत. हा देश राहण्यालायक ठेवला नाही. लोक भयग्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना निराशेने ग्रासले आहे. पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?”

त्याचबरोबर, “मोदी शिर्डीत आले व पुन्हा एकदा खोटे बोलून गेले. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. पण त्यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?’’ असा प्रश्न मोदी यांनी केला. मोदी यांनी पवार यांच्याबाबत आपण आधी काय बोललो व आता काय बोललो हे तपासून घ्यायला हवे होते” अशा शब्दात राऊतांनी शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेविरोधात मोदींना उत्तर दिले आहे.

शरद पवारांचे कौतुक

इतकेच नव्हे तर, खरं तर मोदी सरकारनेच शरद पवार यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातला दुसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ दिला व आता मोदी नेमके उलटे बोलत आहेत. गोंधळलेल्या मानसिकतेचे हे लक्षण आहे. ‘यूपीए’ सरकारच्या काळात पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते. पंजाबराव देशमुखांनंतर लाभलेले पवार हे सर्वोत्तम कृषीमंत्री होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या. त्यात आता पडायचे नाही, पण मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे बहुरंगी कृषिमंत्री देशाला दिले त्यांनी काय केले?” असे संजय राऊतांनी म्हणले आहे.