हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पुन्हा जनतेच्या विश्वासावर सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. मात्र या निवडणुकीत शशिकांत शिंदे विरोध उदयनराजे भोसले यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत चौदाव्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शिंदेंना मागे टाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर विजयाच्या घोषणा केल्या. त्यावेळी उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले.
मतमोजणीच्या चौदाव्या फेरीमध्ये उदयनराजे भोसले यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर 9 हजार मतांची आघाडी घेतली. ज्यामुळे जलमंदिर पॅलेस बाहेर शेकडाे कार्यकर्त्यांनी “एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज” अशी घोषणाबाजी केली. पुढे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष पाहून उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील उपस्थित होत्या. त्यांनीं उदयनराजे भोसले भावूक झालेले पाहून त्यांना प्रेमाने मिठी मारली. पुढे, उदयनराजे हात जोडून जनतेचे आभार मानतात.
महत्वाचे म्हणजे, सध्या सोशल मीडियावर उदयनराजे भोसले यांचा हाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आघाडीवर आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे निकालादरम्यान उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडिओ चर्चेचा भाग बनला आहे. दरम्यान, सातारा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून उदयनराजे भोसले पिछाडीवर होते. परंतु पंधराव्या फेरीनंतर त्यांनी 9736 मतांची आघाडी घेतली.