ग्रामस्थांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. अखेर गुरूवारी त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. पारोडी फाटा येथील स्थानिकांनी रोहित पवारांना जेवणासाठी आग्रह केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा त्यांचा युवा संघर्ष यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. आज रोहीत पवार हे शिरूर तालुक्यातच असणार आहे.

संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्य सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ रोहित पवार यांनी देखील सणसवाडी येथील एका जाहीर सभेत एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, काल त्यांनी काही न खाता पिताच युवा संघर्ष यात्रेत 18 किमी पायी प्रवास केला. तसेच यावेळात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि चर्चा केली.

अखेर रात्री पारोडी फाटा येथे थांबल्यानंतर नागरिकांनी रोहित पवारांसाठी त्यांच्या घरून जेवणाचे डबे आणले. तसेच त्यांनी या डब्यातील दोन दोन घास तरी खावेत असा आग्रह केला. ज्यामुळे रोहित पवार यांना आपले एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे लागले. यावेळी रोहीत पवारांना लहान मुलांनी देखील घास भरवलेत. मुख्य म्हणजे, आज पुन्हा रोहित पवार आपल्या संघर्ष यात्रेचा प्रवास सुरू करणार आहेत. त्यांची ही यात्रा 7 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये संपले.

दरम्यान, युवा संघर्ष यात्रेदरम्यान एका सभेत बोलताना, “जरांगे पाटील आज उपोषणाला परत बसले आहेत. आमची युवा संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांना आज नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण महाग होतंय, बेरोजगारी वाढतेय. एक सामाजिक कार्यकर्ता जर उपोषण करत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. जर तुम्ही घटना दुरूस्ती करू शकता तर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही? या समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे” असे रोहित पवार यांनी म्हणले होते.