वाठारच्या महिला पाठोपाठ पुरूषही म्हणतायत : गावात नको बार, नको देशी- विदेशी की वाईन शाॅपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील वाठार येथे काल महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज पुरूषांचीही ग्रामसभा पार पडली. या सभेत देशी- विदेशी दारू, वाईन शाॅप आणि बियर बार दुकान यांना परवानगी देण्यावर चर्चा करण्यात आली. या विषयाला महिला पाठोपाठ पुरूषांनीही एकमुखाने हातवर करून विरोध दर्शविला आहे. यापुढे गावात नको बार, नको देशी- विदेशी दारू की नको वाईन शाॅपी असे म्हणत उपस्थित ग्रामस्थांनी विरोध केला.

वाठार ग्रामपंचायतीने महिला व पुरूषांची स्वतंत्र ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये प्रामुख्याने गावात देशी- विदेशी दारू दुकान (वाईन शाॅप) आणि बिअर बारला परवाना देण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोरे, रंजना माने, स्वप्निल कानडे, अभिजीत पाटील, ग्रामसेवक रियाज मोमीन, क्लार्क अनिकेत माने उपस्थित होते.

ग्रामसेवक रियाज मोमीन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. आबासाहेब भिमराव पाटील (रा. वाठार) यांना स्वः मालकीच्या जागेत बिअर बार व दारू दुकान सुरू करण्यासाठी ना हरकत दाखल मिळावा, असा अर्ज ग्रामपंचायतीकडे करण्यात आला आहे. यावर पुरूषांचे मत काय आहे, असे ग्रामसेवकांनी विचारताच पुरूषांनी उपस्थितांतील बहुसंख्यांनी हातवर करत विरोध केला. काल सभेला 180 महिला उपस्थित होत्या. तर आज 140 पुरूष उपस्थित होते. त्यापैकी 75 पुरूषांनी बार, दारू दुकान व्हावे या ठरावाच्या विरोधात हात वर केला. तर 22 पुरूषांनी ठरावच्या बाजूने मतदान केले. तर उर्वरीत 43 जणांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे वाठार गावात आता यापुढे बार, देशी- विदेशी दारू किंवा वाईन शाॅप होवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडली.