हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा दरवर्षी पेक्षा १५ दिवस अगोदरच मान्सूनचे आगम झालं आहे. महाराष्ट्रात तर जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे. अशावेळी पेरण्या (Sowing In Farm) करायच्या कि जरा थांबायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. आता याबाबत कृषी विभागाने सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील ओलावा यांचा अंदाज घेऊन पेरणी करावी. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात, जेव्हा पाऊस नियमित होईल, तेव्हा पेरणी करणे योग्य ठरेल असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
25 मे नंतर झालेल्या मूळ मॉन्सूनच्या पावसामुळे राज्यातील खरीप पेरण्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. अतिपाऊस झालेल्या भागात वाफसा येण्यासाठी 8-10 दिवस वाट पाहावी लागेल. तसेच चालू आठवड्यात पाऊस कायम असल्यास शेतकऱ्यांना अंदाज घ्यावा लागणार आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथं वापसा आल्यावर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये, राज्यात साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा संपेल. त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात केल्यास उत्तम ठरेल. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कृषी विभागाने म्हटलं आहे. खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, सूर्यफूल, कापूस, मूग, उडीद, तूर, सोयाबीन आणि भुईमूग यांसारख्या पिकांची लागवड नियोजित आहे. योग्य वेळी आणि पुरेशा ओलाव्याच्या आधारे शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
दरम्यान, मान्सूनपूर्व पावसामुळं राज्यातील 34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याठिकाणी पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामा पूर्ण झाला की त्याचा संबंध अहवाल राज्य शासनाला देण्यात येईल, अशी माहिती पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यांनी दिली. राज्यात 140 मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. त्यामुळं वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे




