परप्रांतीय कामगारांचा संयम सुटला; अहमदाबादमध्ये पोलिसांवर केली दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । गेल्या काही महिन्यांपासून गुजरात सरकार व पोलिसांना परप्रांतीय कामगारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा सातत्याने उद्रेक होताना पहायला मिळतो आहे. अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ पोलीस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी याप्रकरणात काही कामगारांना ताब्यात घेतलं असून सर्वांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेबाबत माध्यमांना अधिक माहिती देताना अहमदाबादचे पोलिस उप-आयुक्त प्रवीण मल म्हणाले, “रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, एक खासगी कार्यालय, आणि कन्स्ट्रक्शन साईटची कामगारांनी नासधूस केली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत.”

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवलेला आहे. गेल्या काही महिन्यांत दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागामार्फत श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे. मात्र देशाच्या काही भागांत अजुनही मजूर व कामगार अडकून पडले आहेत. अशातच मजुरांचा संयम सुटून ते रस्त्यावर हिंसक प्रदर्शन करत आहेत. त्यातून गुजरात पोलीस आणि स्थलांतरित मजूर यांच्यात चकमकी घडत आहेत. याआधीही सूरत, वडोदरा शहरात कामगारांनी पोलिसांवर हल्ला व दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”