पैसे वाटप ते बूथवर धिंगाणा, अहमदनगरचा निकाल कुणाच्या बाजूने?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य…अशी 13 तारखेला पार पडलेली नगरची निवडणूक. भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात घासून झालेल्या या लढतीचा निकाल आता ईव्हीएममध्ये बंद झालाय. बीडमध्ये मतदान संपल्यानंतर 53.27% इतक्या मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली… पैसे वाटपापासून ते चक्क मतदान केंद्रात झालेले अनेक गैरप्रकार यामुळे नगरचं मतदानाच्या दिवशीचं राजकारण गरमागरमीचं राहिलं… पण मतदान कुणाला झालं? निकाल कुणाच्या बाजूने लागेल? याचा जेव्हा मतदारांकडूनच कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अहमदनगरमध्ये तुतारी जोरात वाजणार, असं सगळेच खासगीत बोलू लागलेत. एकूणच प्रचाराच्या काळात काय काय घडलं? नगरमध्ये लंके विरुद्ध विखे यांच्यात शाब्दिक चकमकी कशा झाल्या? आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घडलेल्या अनेक घटनांनी वारं कुणाच्या बाजूने फिरलं?

अहमदनगरमध्ये मतदाना दिवशीच्या मध्यरात्रीच राडा झाला. विखे पाटील समर्थकांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. याची चर्चा मतदानाच्या दिवशीही दिवसभर राहिली. पाथर्डी तालुक्यातील घुमटवाड येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच उमेदवाराला मतदान कसं होईल, यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांना हरताळ फासलं… दिवसाच्या शेवटी 53.27 टक्के इतक्या मतदानाने नगरची निवडणूक पार पडली… लंके आणि विखे यांचं राजकीय भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं असून चार तारखेला तो निकाल लागेल. पण प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी लढत झाल्याने नगरमध्ये मतदानासाठी बरीच चुरस पाहायला मिळाली. पण लोकांचा कल, स्थानिक पत्रकार आणि मतदानाच्या दिवशी असणारा वातावरण हे सगळं पाहता निलेश लंकेंची तुतारी नगरमध्ये वाजताना दिसतेय…

पैसे वाटप ते बूथवर धिंगाणा, Ahmednagar चा निकाल कुणाच्या बाजूने? Sujay Vikhe-Patil, Nilesh Lanke

निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत फिक्स झाल्यानंतर दोघांच्यात बऱ्याच शाब्दिक चकमकी झाल्या. लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवावी… असं जाहीर सभेत केलेलं स्टेटमेंट विखेंवरच बूमरँग होताना दिसलं… तर मतदानाच्या दोन-तीन दिवसांआधीच अजितदादांनी नगरच्या जाहीर सभेतून निलेश लंकेंवर केलेली पर्सनल टीका ही सुजय विखे पाटलांना मतदानाच्या दिवशी बॅकफुटला घेऊन गेली… त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळेस एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदानाच्या दिवसापर्यंत तुतारीकडे शिफ्ट झाली, असा एकूण अंदाज आहे…

खरंतर नगर मधील विखे पाटील हे फार मोठे प्रस्थ. विठ्ठलराव विखे पाटलांपासून ते राधाकृष्ण विखे पाटील आणि पुढे हाच सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा सुजय विखे पाटील पुढे चालवतायत. मूळ काँग्रेसी विचारांच्या असणाऱ्या विखेंनी 2019 च्या आधी कमळ हातात घेतलं आणि भाजपच्या मदतीने मुलाला खासदार केलं. राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना त्यांनी मोठ्या लीडने आसमान दाखवलं होतं. पण आता नगरच्या राजकारणाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचेही डायनॅमिक्स बदलले आहेत. विखे पाटील यंदाही आरामात खासदार होतील, असं चित्र असताना निलेश लंकेंमुळे या सगळ्या शक्यतांना खीळ बसली. मागच्या दहा दिवसांतील राजकरणात लंके यांनी इथं मोठी लीड घेतली…

पण सुजय विखेंच्या विरोधात राजकारण जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातलीच एक म्हणजे पक्षांतर्गत विरोधक…

विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्यापासूनच जिल्हा भाजपमधील अस्वस्थता वाढली होती. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापून नव्या नवख्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्याने भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते. मात्र पक्षादेश पाळून त्यांनी विखेंना निवडून आणलं. यानंतर मात्र विखे पाटलांचा एकक कलमी कार्यक्रम सुरू झाला, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडूनच होऊ लागला. 2019 च्या विधानसभेला भाजपकडून उभे असणारे राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, मधुकरराव पिचड आणि बाळासाहेब मुरकुटे या दिग्गज आणि प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला. पण या सगळ्याला विखे पाटीलच कारणीभूत असल्याचा आरोप या माजी आमदारांनी केला. राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी तर विखे पाटील जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम करतंय अशा अनेक तक्रारी दिल्लीकडे केल्या होत्या. थोडक्यात जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते सध्या विखे पाटलांच्या विरोधात आहेत. दाखवण्यासाठी जरी ते विखे पाटलांच्या सोबत असले तरी आतल्या गोटातून मदतीचा हात ते निलेश लंकेना दिल्याची शक्यता जास्त आहे. आपली स्वतःची यंत्रणा मजबूत असली तरी वाड्यावस्त्यावर पोहोचलेली या स्थानिक नेत्यांच्या यंत्रणानी कमळासाठी कमी आणि तुतारीसाठी जास्त काम केलं असावं.

विखेंच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट प्रस्थापित विरुद्ध सामान्य हे नरेटिव्ह

नगरची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी आहे, असं नरेटीव सेट करण्यात निलेश लंकेना यश आलंय. पारनेरमध्ये आमदारकीची पहिलीच टर्म असताना कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे लंके हे नाव राज्यात सर्वदूर पसरलं. नगरच्या ग्रामीण भागात तर निलेश लंके या नावाची वेगळी क्रेझ आहे. लोकांच्यात मिसळून साधेपणाने काम करण्याची त्यांची स्टाईल ही मतदारांना कनेक्ट करत असते. नगरचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित घराण्यांचं राहिलं. याच घराण्यातून नगरला खासदार मिळाले. पण पहिल्यांदाच नगरच्या निवडणुकीला सामान्य घरातून आलेले नेतृत्व मिळालं आहे, असा सुरू असणारा शरद पवार गटाचा प्रचार लंकेंना प्लस मध्ये घेऊन जाणारा ठरला…

तिसरी गोष्ट येते ते म्हणजे पवार प्लस थोरात समीकरण

विखे पाटलांचे पारंपारिक विरोधक म्हणून थोरात आणि पवार यांच्याकडे पाहिलं जातं. शरद पवारांनी विखेंना केलेला विरोध तर सगळ्यांना माहिती आहेच. त्यामुळे आता शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असताना आणि विरोधात विखे असताना शरद पवार या निवडणुकीत आपली सारी ताकद लावतील. प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांनी नगरच्या काही भागांवर मिळालेल्या कमांडचाही लंकेंना फायदाच होताना दिसतोय. त्यात महाविकास आघाडीचे नेते नगरमध्ये एकदिलाने प्रचार करत असल्यानं तुतारी या घडीला तरी प्रत्येक घरात पोचलेली आहे. या सगळ्यचं प्रतिबिंब 13 तारखेला तुतारीच्या बाजूने दिसेल, असा अंदाजही आता व्यक्त केला जातोय…

नगरच्या प्रचारात मात्र विकासाच्या मुद्द्यांपेक्षा गुंडाराज जास्त चालण्याची सध्या चर्चा आहे. या सगळ्या प्रकाराला लंके आणि विखे जबाबदार असल्याचं एकमेकांकडे बोट दाखवत असले. तरी स्टॅंडिंग खासदार असल्याने याचा मेजर लॉस विखेंना बसू शकतो… थोडक्यात नगरमध्ये कागदावरची आणि ग्राउंडवरची दोन्ही समीकरण हे तुतारीसाठी पूरक आहेत. बॉटम लाईन काय तर लंकेंनी सामान्य विरुद्ध प्रस्थापित असं सेट केलेलं नरेटीव, भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच विखे पाटलांच्या विरोधात पुकारलेला एल्गार, पवार-थोरात जोडगोळी आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हे सगळं निलेश लंकेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसं दिसतंय. त्यामुळे लंके म्हणतात तसं ‘माझा गुलाल फिक्सय’ हा प्रत्येक शब्द न शब्द नगरच्या राजकारणात खरा ठरतो का? याचं उत्तर चार जूनलाच समजणार आहे…