हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बदलत्या काळानुसार जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (Artificial Intelligence) प्रगती वाढत चालली आहे. यामुळेच पुढे जाऊन माणसांची जागा देखील AI घेईल अशी भीती वर्तवली जात आहे. यात तरुणांच्या नोकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसेल, यावर सर्वात जास्त चर्चा करण्यात येत आहे. मात्र, “एआयमुळे भविष्यात नोकऱ्या जाणार नाहीत” असे मायक्रोसॉफ्टचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर, समिक रॉय यांनी म्हटले आहे. त्यांनी या नोकऱ्या का जाणार नाहीत याचे कारण देखील सर्वांना सांगितले आहे.
AI विषयी बोलताना समिक रॉय म्हणाले की, “AI हे लोकांचे कौशल्य सुधारण्यासाठी आहे. जगात अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, पण जेव्हा नोकऱ्या निर्माण करण्याचा आणि प्रदान करण्याचा विचार येतो, तेव्हा आपण थोडे मागे जाऊ या, वीज, स्टीम इंजिन आणि संगणकाच्या सुरुवातीकडे. या सर्वांनी जग बदलले आहे. या गोष्टी जगासाठी नवीन होत्या, पण त्यांनी लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. एआय भविष्यातील नोकऱ्यांची लवचिकता आहे. यातून नोकऱ्यांना धोका नाही.”
त्याचबरोबर, “भारतात संगणक आल्यावर देशात आयटी कंपन्या आल्या, ऑनलाइन व्यापार सुरू झाला, याचा अर्थ थेट नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. यावेळी आम्हाला AI सह आमचे कौशल्य सुधारावे लागेल. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, लोकांना फक्त एआय स्वीकारावे लागेल.” असे रॉय यांनी सांगितले.
दरम्यान, सध्याच्या घडीला एआयमुळे कोणतीही डिजिटल गोष्ट करणे शक्य होत आहे. यामुळे भविष्यात AI ची प्रगती झाल्यानंतर माणसांची गरज देखील भासणार नाही असा दावा केला जात आहे. मात्र मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी हा दावा फेटाळून लावताना दिसत आहेत. तसेच, AI मुळे नोकऱ्या जाणार नाही तर नोकऱ्यांमध्ये वाढ होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. यालाच दुजोरा देत भविष्यात AI मुळे नोकऱ्या वाढतील असे समिक रॉय यांनी सांगितले आहे.