अजित पवार आणि अमित शहांची दिल्लीत बैठक! आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार मुद्दे चर्चेचा भाग?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये तब्बल दीड तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु हे मुद्दे नेमके कोणते होते याबाबत अद्याप तरी खुलासा झालेला नाही. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शहांबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अजित पवार गट नाराज आहे. या कारणामुळे देखील अजित पवार यांनी शहांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना

मध्यंतरी अजित पवार यांना डेंगूची लागण झाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. यामुळे जवळपास दोन आठवडे त्यांना सार्वजनिक आणि सरकारी कामकाजामध्ये उपस्थित राहता आले नाही. मुख्य म्हणजे, यंदाच्या दिवाळीमध्ये देखील त्यांना बारामतीला येता येणार नाही. अशी माहिती त्यांनी दिली होती. परंतु काल शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. ज्यामुळे राजकिय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दिल्लीला गेल्यानंतर सर्वात प्रथम अजित पवारांची अमित शहांबरोबर बैठक पार पडली.

अमित शहा आणि अजित पवारांची ही बैठक तब्बल दीड तास सुरू होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी महाराष्ट्रातील अनेक विविध मुद्दे शहान समोर मांडल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याचा मुद्दा देखील अजित पवारांनी या बैठकीत मांडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीनंतर आता अमित शहा लवकरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत ते महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.