अजितदादांचे अमोल कोल्हेना खुलं आव्हान; म्हणाले की, त्यांच्याविरोधात…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 गट पडल्यानंतर आता या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल शरद पवारांवर टीका केल्यानंतर आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) याना थेट आव्हान दिले आहे. मागच्या निवडणुकीत एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केलं, परंतु आता त्यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि निवडून सुद्धा आणणार असं म्हणत अजित दादांनी अमोल कोल्हे याना नाव न घेता ललकारले आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पाच वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केलं. परंतु जिंकून आल्यानंतर त्यांचे मतदारसंघातच लक्ष्य नव्हतं. त्यानंतर काही वर्षातच त्यांनी मी राजीनामा देतो अशी मागणी आमच्याकडे आणि वरिष्ठांकडे केली. त्यावेळी ते म्हणाले, मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर याचा परिणाम होतोय, असेही त्यांनी त्यावेळी सांगितलं होते असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हेंवर टीका केली.

अजित पवार पुढे म्हणाले, ते उत्तम वक्ते आहेत. उत्तम कलाकार आहेत. संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार आहोत, आणि त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार सुद्धा निवडून आणणार. तुम्ही काळजीच करू नका, असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हे याना खुलं आव्हान दिले आहे. अजित पवारांच्या या आव्हानानंतर आता अमोल कोल्हे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहायला हवं. परंतु एकंदरीत जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली आहे तस तसे राजकीय टीका टिपण्या सुद्धा वाढल्याचे दिसत आहे.