हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रासाठी घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांची सुकाळ असणार हा अर्थसंकल्प आहे असं म्हणत अजित पवारांनी सडकून टीका केली आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, हा अर्थसंकल्प विकासाचं पंचामृत आहे. ते कधी दिसणार नाही, असं म्हणत २०१४ पासून तुम्ही केलेल्या घोषणांचं काय झालं असा सवाल अजित पवारांनी शिंदे सरकारला केला. आजचा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. वाणीला आणि ऐकणाऱ्याच्या कानाला बरं वाटावं असाच आजचा अर्थसंकल्प आहे. राज्य कर्जाच्या खाईत असताना वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प मांडला अशी टीका अजित पवारांनी केली.

मला तर फडणवीस अर्थसंकल्प वाचत असताना 14 मार्चची आठवण येत होती. तेव्हा सर्वोच्य न्यायालयाचा निकाल आहे. बहुतेक या सरकारला समजल आहे की 14 मार्चला निकाल आपल्या विरोधात लागणार त्यामुळे आधीच अर्थसंकल्पात घोषणा करूया. ते तरी कारण असेल किंवा शिक्षक पदवीधर मतदारसंघ आणि कसब्यातील निवडणुकीत जो झटका बसला आहे त्यामुळे अशा घोषणा केल्या का अशी शंकाही अजित पवारांनी उपस्थित केली.