श्रीरंग बारणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी ॲक्टिव्ह; पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 ला पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात उभा होता. त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे प्रचाराला आलो आहे. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत. ते कुठल्या पातळीवर गेले आहेत… मावळात शिवसेनेची उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी अजित दादांनी हजेरी लावल्यानंतर रोहित पवारांनी ही जुनी ढपली उकरून काढली. 2019 हे वर्ष पवार कुटुंब विसरू शकले नाही. कारण पार्थ पवार च्या रूपाने पवार कुटुंबाचा मावळात पहिला पराभव झाला होता. भल्या भल्यांची राजकारणात जिरवणाऱ्या अजितदादांच्या चिरंजीवांना म्हणजेच पार्थ पवार यांना शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांनी आसमान दाखवलं होतं. पण महायुतीत आल्यावर जमिनीवरची गणितं बरीच बदलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हारी लागलेला घाव पचवून ज्यांनी आपल्या मुलाला पाडलं त्याच श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ अजितदादांवर आलीय.

महायुती धर्म पाळण्यासाठी आणि आपल्या अधिक खासदारांना निवडून देण्यासाठी अजित दादांनी अनेक ठिकाणचं राजकीय वैर विसरून तडजोडी केल्या आहेत. मावळ आणि विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासोबत जुळवून घेणं हा त्यातलाच एक प्रकार. अजितदादांची महायुती धर्म पाळण्याची निष्ठा पाहता ते घड्याळाची पूर्ण ताकद मावळात धनुष्यबाणाच्या पाठीशी लावतील, असं चित्र दिसत असताना काही वेगळे अँगलही यानिमित्ताने बाहेर आलेत… आपल्या मुलाच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी अजितदादाच ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांना आतून ताकद देत असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यासाठी अजितदादांनी अगदी सिस्टिमॅटिक फील्डिंग लावल्याचंही खासगीत बोललं जातंय. ही सगळी चर्चा नेमकी कशाच्या आधारावर होतेय? अजितदादा खरंच बाहेरून एक आतून एक असं करत बारणेंचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात का? तेच पाहुयात

Shrirang Appa Barane यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी ॲक्टिव्ह, Parth Pawar यांच्या पराभवाचा बदला घेणार

तर विषय असा आहे की, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी अजित दादा आले होते. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर आल्यावर काही मिनिटातच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील देखील तिथं उपस्थित झाले. आणि ते थेट अजितदादांच्या पाया पडले… वाघेरे पाटलांनी केलेले ही कृती पाहून अजितदादांनाही अवघडल्यासारखं झालं. जेवणाच्या ठिकाणीही हे दोन नेते एकत्र आले पण अजितदादांनी त्यांच्यासोबत बोलण्याचं अगदी कटाक्षाने टाळलं. सीन घडला.. पण याची चर्चा पुऱ्या गावभर झाली. मीडियानं या बातमीचा पुरता बाजार उठवला. अनेक तर्कवितर्क लावले गेले. त्यातलाच एक तर्क म्हणजे 2019 च्या पराभवाची न पुसता येणारी आठवण…

तसं बघायला गेलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवर अजितदादांची चांगली पकड आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजितदादांनी 2019 मध्ये पार्थला शिवसेना उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विरोधात उभ केलं. मात्र या निवडणुकीत पार्थ पवारचा अत्यंत मानहानीकारक पराभव झाला. अजित दादांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेतेही या पराभवाने खलील झाले होते. म्हणूनच जेव्हा 2024 च्या उमेदवारीचा विषय तोंडावर आला. तेव्हा ‘कमळ चिन्हावर कुणीही चालेल पण बारणे नको’ असा स्टॅन्ड राष्ट्रवादीने घेतला. बारणे यांना उमेदवारी का नको? याचा एक सविस्तर अहवालच राष्ट्रवादीचे नेते सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिला होता. थोडक्यात 2019 ला ज्याच्याकडून पवार कुटुंबातील एका सदस्याचा पराभव झाला. त्याचाच प्रचार फक्त युतीधर्माच्या नावाखाली करायचा हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अत्यंत अवघड गेलं असतं. म्हणूनच श्रीरंग आप्पा बारणे यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची या निर्णयावर नाराज आहे. पक्षादेश म्हणून वरकरणी जरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बारणेंचं काम करत असले तरी ईव्हीएममध्ये बटन दाबण्याच्या वेळेस ते नक्की कुणाला सपोर्ट करतील, हे आजच विश्वासानं सांगता येत नाही…

यातला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर होण्याचा…संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीतलं मोठं प्रस्थ. त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी शरद पवार यांना भक्कम साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाघेरे यांच्या मनात चलबिचल सुरू होती. सुरूवातीला शरद पवार यांच्यासोबत राहिलेले वाघेरे पुढील राजकीय समीकरण लक्षात घेऊन अजितदादांसोबत गेले. मात्र मावळमधून उमेदवारी मिळण्याच्या शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी ठाकरेंची मशाल हातात घेत मविआकडून लोकसभेची उमेदवारीही मिळवली. राष्ट्रवादीनं जेव्हा मावळच्या जागेचा हट्ट लावून धरला होता. तेव्हा जर का ही जागा राष्ट्रवादीला सुटली असती तर अर्थातच घड्याळाच्या चिन्हावर संजोग वाघेरेच निवडणूक लढताना दिसले असते. दोन टर्म इच्छा असूनही त्यांना मावळातून लढता आलं नव्हतं. पण यंदा सुट्टी नॉट हा प्रण करून त्यांनी खासदारकीसाठी शेवटी मशाल हाती घेतली. पण शेवटी नाही म्हणलं तरी वाघोरे अजितदादांचेच कट्टर कार्यकर्ते. त्यामुळे ठाकरे गटाकडून तिकीट मिळवत बारणेंच्या विरोधात उभं राहण्यामागं अजितदादांचीच छुपी ताकत तर नाहीये ना, असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो…

कोणत्याही परिस्थितीत मावळ मधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. आपला विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याशी आपले अनेक वर्षांचे संबंध आहेत. परंतु मतदान होईपर्यंत विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका. अगदी गप्पा टप्पा मारायलाही नाही. निवडणुकीसाठी नातेसंबंध बाजूला ठेवा, अशा स्पष्ट शब्दात अजितदादांनी मावळ मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात. अजित दादाही झालं गेलं विसरून जात मुव ऑन करून बारणेंच्या प्रचाराला लागलेत. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी शंकेची पाल चूकचुकल्याशिवाय राहत नाहीये.. एकूणच बारणे यांना घड्याळाचं अचूक टाइमिंग साधत 2019 चा वचपा अजित दादा काढणार का? बारणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीतच मोठं कट कारस्थान शिजत तर नाहीये ना? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.