अजित पवार हीच राष्ट्रवादी; गुलाबरावांकडून राजकीय भूकंपाचे संकेत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली होती. आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्व चर्चाना अप्रत्यक्षरित्या दुजोरा देत सूचक संकेत दिले आहेत. अजित पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ते म्हणतील तेवढा आकडा जमेल असं त्यांनी म्हंटल आहे.

जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, मी बातम्यांमध्ये या सर्व चर्चा पाहिल्या आहेत. बरेच आमदार अजित पवारांसोबत आहेत. पण कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे. मात्र त्यासाठी अजून कुळ बघावं लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. येव्हडच नव्हे तर अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे त्यामुळे ते सांगतील तो आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असतील असेही गुलाबराव पाटलांनी म्हंटल.

अंजली दमानिया यांचा नेमका दावा काय?

खरं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विट नंतरच अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा रंगल्या. त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर ट्विट करत म्हंटल होते की, मी मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, त्यावेळी तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत तेही लवकरच… बघू…आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं त्यांनी म्हंटल होत. या ट्विटपूर्वी त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो सुद्धा ट्विटरवर शेअर केला होता. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.