Saturday, June 3, 2023

Satara News : अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी पाटणला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघातील गुढे (तळमावले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे . या प्रसिद्धी पत्रकात पुढे सांगण्यात आले आहे की, या मेळाव्याला खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, आ. दिपक चव्हाण, दिपक पवार, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव- ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, सर्व आजी – माजी जि. प. व पं. स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्यात थेट फाईट पाहायला मिळते. आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच २ नेत्यांमध्ये लढत पाहायला मिळू शकते.