इंदू मिल स्मारकावरून कोणी राजकारण करू नये; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी इंदू मिलचे काम राज्यसरकार लवकर पूर्ण करेल असे म्हंटले. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. “चैत्यभूमीवरची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. 2024 पर्यंत इंदू मिल स्मारक व्हायला हवं, यामध्ये कोणी राजकारण करू नये, असा इशारा पवार यांनी दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक अनुयायी दाखल झाले आहेत. आज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज तुमचा-माझा भारत देश एकसंघ राहिला आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे वातावरण आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मी अर्थमंत्री होतो तेव्हा धनंजय मुंडेंना मी नेहमी सांगायचो, की इंदू मिल इथे होणारे बाबासाहेबांचा स्मारक लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही. मात्र, आता सरकार बदलले आहे. आम्ही आता विरोधीपक्षात आहोत. आमची अपेक्षा आहे की सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण आणू नये, असे पवार यांनी म्हंटले.