छ. संभाजी महाराजांबद्दलच्या विधानाबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले की..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र आज खुद्द अजित पवारांनीच माध्यमांसमोर येऊन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आज. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराजांना न्याय देणं आहे असं म्हणत ते आपल्या विधानावर ठाम राहिले आहेत. तसेच भाजपला माझा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना ठणकावलं आहे.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं. स्वराज्यमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. आणि त्यांचे रक्षण संभाजी महाराजांनी केलं त्यामुळे स्वराज्यरक्षक म्हणणंच त्यांना न्याय देणारे आहे. त्यामुळे मी असा कोणता गुन्हा केलाय का? कि मी महाराजांबद्दल कोणते अपशब्द वापरलेत? असा उलट सवाल अजित पवारांनी भाजपला केला. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही निधी दिला. मी कधीच महापुरुषांबाबत चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेते पद दिले नाही, माझ्या पक्षाने मला ते पद दिले आहे. असं अजित पवारांनी म्हंटल.

बेताल वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान  राज्यपालांनी केला. या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनीही शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं जावईशोध लावला. गोपीचंद पडळकर यांनीही अफझलखानाने शिवरायांचा कोथळा काढला असं विधान केलं होत अशा प्रकारची वक्तव्ये भाजपचे मंत्री आमदार करत आहेत, त्याबाबत बोलायला हे तयार नाहीत असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर पलटवार केला.