राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचा पहिला बारामती दौरा; विकास कामांची करणार पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) येत्या शनिवारी पहिल्यांदाच बारामती (Baramati) दोैऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी अजित पवार यांच्या हस्ते काही विविध बांधकामांचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच त्यांची भव्य मिरवणूक बारामतीत काढली जाईल. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार शनिवारी पहिल्यांदाच बारामतीत येणार असल्यामुळे त्यांचा हा दौरा खूपच विशेष ठरणार आहे. या दौऱ्यासाठी बारामतीत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

सर्वात प्रथम बारामतीत आल्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच, अजित पवार इतर कामांची पाहणी करतील. मुख्य म्हणजे, अजित पवारांच्या भव्य मिरवणुकीनंतर त्यांचा शारदा संस्थेच्या प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या सत्कारासाठी राष्ट्रवादीचे कोणते नेते उपस्थित राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकानंतर अजित पवार खास बारामती दौऱ्यासाठी आले नव्हते. मात्र आता येत्या शनिवारी त्यांचे बारामतीत आगमन होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावेळी अजित पवार काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी अजित पवार दर शनिवारी बारामतीतील विकास कामांची पाहणी करण्यासाठी येत होते. परंतु मागील अडीच महिन्यात त्यांचा बारामती दौरा झालेला नाही. आता शनिवारी होणाऱ्या दौऱ्यात अजित पवार काही महत्त्वाच्या घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बारामती तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात शरद पवारांचा अजित पवारांचे देखील तितकेच वर्चस्व आहे. मुख्य म्हणजे, या तालुक्यावर भाजपचा देखील तितकाच डोळा आहे. आता अजित पवारच भाजपमध्ये गेल्यामुळे बारामती मतदारसंघात काय समीकरणे पाहायला मिळतील याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांची तयारी सुरू असताना अजित पवारांचा बारामतीत होणारा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.