Sunday, April 2, 2023

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली राज्यपालांची भेट; मांडले समाज हिताचे प्रश्न

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोना काळात राज्यात सर्वत्र टाळेबंदी सातत्याने वाढवली जात आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात अनेक पालकांचे रोजगार बुडाले आहेत. खाजगी क्षेत्रांमधील नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर व योग्य त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून भरमसाठ प्रमाणात आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क पालक शाळा, महाविद्यालयांना देऊ शकत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी राज्यपालांची भेट घेण्यात आली.

कोरोनामुळे सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अभाविपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सिद्धेश्वर लटपटे, प्रेरणा पवार, अखिलेश भारतीय आदिंचा समावेश होता. या भेटीत राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर जिमखाना, विविध गुणदर्शन/उपक्रम, कॉलेज मॅगझिन, संगणक, क्रिडा निधी, वैद्यकीय मदत निधी, युथ फेस्टिवल अशा विविध बाबींवर खर्च करण्यात आला नाही.

- Advertisement -

या बाबींसाठी पूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश शासनाने विद्यापीठांना दिलेले आहेत. तरी सर्व विद्यापीठांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे. सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, कृषी व वैद्यकीय महाविद्यालयांचे भरमसाट असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होत असताना शुल्क हे ऑफलाईन परीक्षा पद्धती प्रमाणे आकारले जात आहे. त्यामुळे परीक्षा शुल्कात कपात करण्यात यावी. आदी मागण्या मांडून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी विनंती अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केली आहे.