Akshaya Tritiya 2024 | हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. याच दिवशी धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यासह सोन्याचे दागिने खरेदी करण्यात येतात. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. त्यानुसार यंदाही अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024) येत्या 10 मे 2024 रोजी साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय्य तृतीया पूजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.
अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त(Akshaya Tritiya 2024)
यंदा अक्षय्य तृतीया हा सण शुक्रवार 10 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषांच्या मते, यादिवशी शुभ मुहूर्त पहाटे 4.17 वाजता सुरू होईल. तर 11 मे 2024 रोजी पहाटे 02:50 वाजता संपेल. महत्वाचे म्हणजे, उदय तिथीच्या आधारे अक्षय्य तृतीया हा सण 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5.48 ते दुपारी 12.23 पर्यंतच असेल. या काळामध्ये लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णुची पुजा केल्यास सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ होईल.
हिंदू धर्मात, अक्षय्य तृतीया हा सण अनेक कारणांसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात ही अक्षय्य तृतीयेपासून झाली होती. तसेच, भगवान विष्णूंनीही याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता. इतकेच नव्हे तर, भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय्य तृतीयेला झाला होता. या शुभ तिथीपासूनच श्रीगणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरुवात केली होती.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व (Akshaya Tritiya 2024)
एवढेच नाही तर, अक्षय्य तृतीयेलाच बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात आणि याच दिवशी भगवान बांके-बिहारीजींचे पाय वृंदावनात पाहता येतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता गंगा भगवान विष्णूच्या चरणांवरून पृथ्वीवर अवतरली होती असे ही पौराणिक कथेत म्हणले आहे. अशा अनेक विविध कारणासाठी अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
खास म्हणजे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून सोन्याची खरेदी करण्यात येते. हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्यास संपत्तीत आणखीन वाढ होते. तसेच, लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यामुळे घरात सुख, समृद्धी, संपत्ती येते. (Akshaya Tritiya 2024)