औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते आंबेडकरी संघटना तसेच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून आज येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे गेट खोलण्यासाठी आंदोलकांनी राडा घातल्याचेही पाहायाला मिळाले.
औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच काही कर्मचाऱ्यांवर अन्यायदेखील सुरु असल्याचा आरोप आंबेडकरी संघटनांनी घेतला आहे. याच कारणामुळे आंबेडकरी संघटनांनी भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविरोधात आक्रमक पवित्रा धारण करत आंदोलन छेडले आहे. आज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी राडा घातला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
आरक्षण डावलून केलेल्या नियमबाह्य नियुक्त्या,कलंकित प्रतिमा असलेल्या PRO संजय शिंदे, डॉ.गीता पाटील, डॉ.प्रशांत अमृतकर सारख्या अधिकारी, प्राध्यापक,कर्मचाऱ्यांना अभय पुरवणे, आर्थिक भाराच्या नावाखाली विविध विभाग बंद पाडणे, नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून परावृत्त करणे, मनमानी पद्धतीने वेतन देणे-सेवेत कायम करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारे उपक्रम राबवणे, संशोधक विद्यार्थ्यांना पैशांची मागणी करणाऱ्या प्राध्यापक-विभागप्रमुख ह्यांच्या विरोधातील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात-चौकशीत अपूर्ण माहिती पुरवून त्यांना अभय पुरविणे,परीक्षेच्या निकालात-मूल्यांकनातील गैरप्रकार,वसतिगृहातील अपुऱ्या सोयीसुविधा असे अनेक नियमबाह्य प्रकार सातत्याने विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी श्रावण गायकवाड, डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अनिल पांडे, देवानंद वानखेडे, नागराज गायकवाड, डॉ.किशोर वाघ,डॉ. अरुण शिरसाठ, सचिन निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.