अमित शहा यांच्या बहिणीचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरी शहा यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी मुंबईतील राजेश्वरी यांची भेट घेतली होती. अखेर आज राजेश्वरी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्य म्हणजे, राजेश्वरी यांच्या निधनामुळे शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एका भाजप नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे की, अमित शहा यांनी त्यांची मोठी बहीण म्हणजेच राजेश्वरी यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. आज अमित शहा यांचे गुजरातमध्ये दोन सार्वजनिक कार्यक्रम होणार होते. त्यातील एक कार्यक्रम देवदार येथील बनास डेअरी येथे होणार होता. तर दुसरा कार्यक्रम गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात होणार होता. मात्र राजेश्वरी यांच्या निधनानंतर त्यांनी त्वरित हे कार्यक्रम रद्द केले.

दरम्यान, राजेश्वरी शहा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. या काळात स्वतः अमित शहा यांनी मुंबईत येऊन रजूबेन यांची भेट घेतली होती. मात्र आज रजूबेन यांच्या निधनामुळे शहा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता राजेश्वरी यांच्या पार्थिवावर थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.