हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे सुपुत्र अमोल बाबर यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे (Mangesh Survase) यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालकाची नियुक्तीसाठी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमोल बाबर (Amol Babar) यांची सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अमोल बाबर यांच्या समर्थकांमध्ये जलोषाचे वातावरण आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात अनिल बाबर यांचे निधन झाले होते. त्यांनी खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक पदाची जबाबदारी निभावली होती. मधल्या काळात नवीन संचालकांच्या निवडीसाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर गुरुवारी नवीन संचालकाची निवड झाली. प्राधिकरणने जिल्हा उपनिबंधक (सहकार) मंगेश सुरवसे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकृत केले.
महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यादरम्यान फक्त अनिल बाबर यांचे पुत्र अमोल अनिल बाबर यांचा एकच अर्ज दाखल झाला. यानंतरच अमोल बाबर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अमोल बाबर हे शिवसेनेचे युवा नेते असून त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत समाजकारण आणि राजकारणाची वाट धरली आहे. युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघातील जनता बघत असते….आता थेट जिल्हा बँक संचालकपदी त्यांची निवड झाल्याने खानापूर आटपाडी मतदारसंघातील जनतेसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.