Amravati Airport : विमान आहे पण पेट्रोलच नाही; अमरावतीत फ्लाईट रद्द करण्याची नामुष्की

Amravati Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amravati Airport। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून हवाई वाहतुकीवरही त्याचा परिणाम दिसत आहे. असाच काहीसा प्रकार अमरावतीत घडला आहे. अमरावती विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांना अचानक खाली उतरवण्यात आलं.. कारण म्हणजे विमानात पेट्रोलच नव्हतं. विमानामध्ये पेट्रोल भरणारा टँकर पावसामुळे मातीत फसल्याने ऐनवेळी विमान उड्डाणाची फेरी रद्द करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. अनेक प्रवासी तर संतप्त झाले. विमान आहे पण पेट्रोलच नसल्याने फ्लाईट रद्द करण्याची नामुष्की आली.

विमानात पेट्रोल भरणे शक्य झालं नाही- Amravati Airport

अमरावती विमानतळावरून (Amravati Airport) नेहमीप्रमाणे सायंकाळी ४:३० च्या सुमारास 74 प्रवाशांनी भरलेलं विमान मुंबईला जाणार होते. त्यापूर्वी अमरावती विमानतळावर टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाणार होतं. मात्र, पेट्रोल भरणारा टँकर पावसामुळे मातीत फसल्याने मोठा घोटाळा झाला. ठरलेल्या वेळेत विमानात पेट्रोल भरणे शक्य झालं नाही, आणि विमानाचे उड्डाण रद्द करावं लागलं. खरं तर तोपर्यंत मुंबईकडे जाणारे प्रवाशी विमानतळावर पोहचले होते. सर्व प्रक्रिया पार पडली होती. पायलटने सुद्धा सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली होती. मात्र वेळेत पेट्रोल भरण्याचे नियोजन न झाल्याने पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत सायंकाळ झाली. अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आलं.

या घटनेनंतर प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला. अनेकांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दरम्यान, मागच्या महिन्यातच म्हणजे 16 एप्रिल 2025 ला अमरावती विमानतळाचे (Amravati Airport) उदघाटन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आलं होते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावतीला विमानतळ मिळाल्याने अमरावतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विमानतळासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही अमरावतीत सुरु होणार असल्याची माहिती त्यावेळी फडणवीसांनी दिली होती.