Amrit Bharat Station : मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! शहरातील चार रेल्वे स्थानकं आता केवळ प्रवासाचे ठिकाण राहिली नसून, ती बनली आहेत आधुनिकतेचे प्रतीक. चिंचपोकळी, परळ, माटुंगा आणि वडाळा रोड हे चार रेल्वे स्टेशन ‘अमृत भारत स्टेशन योजना’ (Amrit Bharat Station)अंतर्गत पूर्णतः बदलले गेले असून, आता या ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.या स्टेशनच्या नव्या रूपाचा वर्च्युअल उद्घाटन समारंभ २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
रेल्वे विकासाची ‘अमृत’ क्रांती (Amrit Bharat Station)
भारतातील पहिली रेल्वे मुंबईहून सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा मुंबई रेल्वेच्या नव्या युगाला सुरुवात झाली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत, देशभरातील १०३ स्टेशन्सचा पुनर्विकास करण्यात आला असून, महाराष्ट्रातील १५ स्टेशन त्यात समाविष्ट आहेत. पंतप्रधान मोदी बीकानेरहून या सर्व स्टेशनच्या उद्घाटनास वर्च्युअली जोडले जाणार आहेत.
या ४ स्टेशनवर झाले कोणते बदल?
| स्टेशनचे नाव | खर्च (कोटी ₹) | वैशिष्ट्यपूर्ण बदल |
|---|---|---|
| चिंचपोकळी | ११.८१ | प्लॅटफॉर्म नूतनीकरण, वॉटर बूथ, वर्टिकल गार्डन, एफओबी सौंदर्यीकरण |
| परळ | १९.४१ | नवी स्टेशन इमारत, टेन्साइल रूफ, एसटीपीयुक्त टॉयलेट ब्लॉक, बागकाम |
| माटुंगा | १७.२८ | प्लॅटफॉर्म वाढ, दिव्यांगांसाठी सुविधा, ऐतिहासिक लाकडी कमानींचे संरक्षण |
| वडाळा रोड | २३.२ | आधुनिक टॉयलेट्स, प्लॅटफॉर्म फ्लोअरिंग, सीओपी दुरुस्ती, एफओबी सजावट |
फक्त १५ महिन्यांत पूर्ण
या सर्व कामांवर एकूण १३८ कोटींपेक्षा अधिक खर्च झाला असून, केवळ १५ महिन्यांत ही कामे पूर्ण झाली आहेत. प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित वातावरण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचाही समावेश डिझाइनमध्ये केला गेला आहे.
पर्यावरणपूरक आणि प्रवाशाभिमुख योजना
‘अमृत भारत स्टेशन योजना’चा उद्देश केवळ इमारतींचा मेकओव्हर नाही, तर ही स्टेशनं भविष्यातील ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्याचा आहे. दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, हरित तंत्रज्ञान, शहरी एकात्मता आणि स्थानिक परंपरेचे दर्शन हे या योजनेचे मुख्य घटक आहेत.
नाशिक-अहिल्यानगरला बूस्ट देणारा नवा 6-पदरी महामार्ग! गडकरींची मोठी घोषणा, ‘हा’ रस्ता गेमचेंजर ठरणार
महाराष्ट्रातील हे १५ स्टेशन सामील (Amrit Bharat Station)
मुंबईतील चार स्थानकांव्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यातील शहाड, जलगावमधील सावदा, नाशिकचे देवलाली व लासलगाव, धुळेचे धुळे, साताऱ्यातील लोणंद, पुण्यातील केडगाव, पुणे, मोरतिजापूर आदी स्टेशनही या योजनेच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहेत.
नव्या युगाकडे भारतीय रेल्वेचा प्रवास सुरू
डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत देशभरातील १,३०९ स्टेशन टप्प्याटप्प्याने जागतिक दर्जाच्या सुविधांनी सजली जाणार आहेत. भारताची रेल्वे केवळ प्रवासाचे साधन न राहता, ही देशाच्या विकासाची खरी ‘जीवनरेखा’ बनणार आहे.




