स्वातंत्र्यशाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींनी असा रचला डाव..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबाला विजेचा करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र रचलेला कट फसल्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखरूपपणे वाचले आहे. शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूच्या दरवाजाला विजेच्या विद्युतवाहक तारेद्वारा 11 केव्हीचा करंट देण्यात आला होता. मात्र 11 केव्हीचा करंट वापरल्यामुळे संपूर्ण गावची वीज बंद पडली. ज्यामुळे निकम यांचे कुटुंब सुखरूपपणे बचावले. या सर्व घटनेनंतर निकम कुटुंबाने चिंचणी वांगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

करंट देऊन मारण्याचा प्रयत्न

समोर आलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यशाहिर कै. शंकरराव निकम यांचे मोठे सुपुत्र अशोकराव निकम वांगी गावात राहतात. मंगळवारच्या रात्री अशोक निकम आपली पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या 1 वाजता अचानक घरासमोर विजेचा जाळ झाल्याचा आणि लाईट गेल्याचा प्रसंग घडला. मात्र, घराजवळ असलेल्या ट्रांसफार्मरमध्येच जाळ झाला असे समजून सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा विज आल्यानंतर घरालगत जाळ झाला त्यावेळी संपूर्ण कुटुंब खळबळून जागे झाले. ज्यावेळी अशोकराव निकम यांनी घराच्या बाहेर पाहिले तेव्हा विजेच्या विद्युत वाहक तारा घराच्या दरवाजाजवळ अडकलेल्या दिसून आल्या. इतकेच नव्हे तर, पुढे त्यांच्या हे लक्षात आले की घरासमोरच्या ट्रांसफार्मरवरील 11 केव्ही तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने करंट देण्यात आला आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे तर सर्वांनाच घाम फुटला.

आरोपींचा डाव फसला

यानंतर जेव्हा घरातील सर्वजण बाहेर आले त्यावेळी काही अज्ञात व्यक्ती विद्युत तारेला जोडण्यात आलेली एक हजार फूट लांब दोरी ओढण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु, ही दोरी घेऊन जाण्यास त्यांना अपयश आले आणि सर्वांनी तेथून पलायन केले. या सर्व घटनेमुळे निकम कुटुंब पूर्णपणे घाबरून गेले होते. त्यांनी तातडीने बचावासाठी हालचाली सुरू केल्या. या सर्व प्रसंगातून सुखरूप वाचल्यानंतर निकम कुटुंबाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगून अज्ञात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. सध्या पोलीस या सर्व घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

दरम्यान, निकम कुटुंबाच्या घराबाहेर नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून तारांचे नियंत्रण जोडण्यात आले होते. ट्रान्सफॉर्मर सुरू करून तार खेचायची असा डाव हल्लेखोरांनी रचला होता. हल्लेखोरांनी निकम कुटुंबाच्या घराबाहेर चहूबाजूंनी 11 केव्ही तारेने घराला करंट दिला होता. यातूनच हे स्पष्ट होते की, हल्लेखोराने संपूर्ण निकम कुटुंबाला मारण्यासाठी हा सर्व डाव रचला होता. मात्र या सर्व प्रकाराची लवकर म्हणत लागल्यामुळे संपूर्ण निकम कुटुंबाचा जीव वाचला.