कसलं हे राजकारण!! मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडलं म्हणून चक्क कुत्र्यावर FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्यामुळे चक्क एका कुत्र्यावर FIR दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी एका महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. यामुळे देशभरातील राजकारणाचा स्तर किती खालावला आहे हे दिसून येतेय. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल करणारी महिला विरोधी पक्ष टीडीपीची कार्यकर्ता आहे.

माहितीनुसार, वायएस जगन मोहन रेड्डी यांचे घराच्या भिंतीवर लावलेले पोस्टर रस्त्यावरील कुत्र्याने फाडले. त्यानंतर विजयवाड्यात महिलांच्या एका गटाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्यामुळे कुत्र्याने राज्यातील सहा कोटी लोकांना दुखावल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. असं कृत्य म्हणजे 151 जागा जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या नेत्याचा हा अपमान आहे असं म्हणत त्यांनी याप्रकरणी कुत्रा आणि त्यामागील लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी कुत्रा आणि त्याच्या मालकाचा शोध घेण्याचे काम सुरु केलं आहे. कुत्र्याने हे पोस्टर्स फाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा पोस्टर फाडताना आणि भिंतीवरून ओढताना दिसत आहे. मात्र अशा प्रकारे कुत्र्यावर FIR दाखल करण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल. तसेच या प्रकारामुळे राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे हे सुद्धा स्पष्ट झालं आहे.