तांबव्याच्या विष्णुबाळाने ‘या’ एका व्यक्तीमुळे स्वतःला केलं पोलिसांच्या स्वाधीन; कोण होती ती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की जिल्हा त्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे, जुनी जाणती मंडळी आजही अशा घटनांना विसरलेले नाही. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या विष्णू बाळा पाटील यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत जाणून घेणार आहोत. त्यांनी पाटण खोऱ्यातील सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं केलं. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली. आणि त्यानंतर शेवटी एका व्यक्तीच्या शब्दावरून स्वतः ला पोलिसांच्या स्वाधीन केले. कोण होती ती व्यक्ती? त्यांनी दाखवलेल्या त्यावेळचा विश्वास आजही जुन्या पिढीतील मंडळी विसरलेले नाहीत.

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेले तांबवे या गावाची ओळख आज संपूर्ण राज्यभर आहे. कारण या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळाचा वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन तांबवे येथील कोयना नदीकाठी वाळवंटात झाले होते. या गावाची खरी ओळख ही तांबव्याचा विष्णुबाळा पाटील या मराठी चित्रपटामुळे साऱ्या देशाला झाली. स्वातंत्रसैनिकांच्या या गावात 1952-53 साली पै. आण्णा बाळा पाटील आणि पै. विष्णु बाळा पाटील या दोन सख्ख्या पैलवान भावांनी मिळून गाव वेगळ्याचं कारणांनी चर्चेत आणलं.

12 डिसेंबर 1942 चा दिवस तांबव्याला मिळाला पहिला सरपंच

आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या तांबवे या गावी आण्णा बाळा पाटील हे आले. गावातील एक शिक्षित असावा पाटील घराण्यातील युवक असल्या कारणांनी गावाने आण्णा बाळा पाटील यांना सरपंच केले. 12 डिसेंबर 1942 चा दिवस होता. या दिवशी आण्णा बाळा पाटील यांनी सरपंचपदाची शपथ घेतली. ते पुढे सलग पाच वर्ष एक उत्तम असे सरपंच म्हणून काम पाहिले. सरपंच झाल्यावर त्यांनी गावाचा विकास सुरू केला नविन योजना सुरू केल्या. आण्णांनी केलेल्या विकास कामांमुळे सर्वांच्या तोंडी अण्णा बाळा, अण्णा बाळा हेच ऐकू येऊ लागले. नंतर त्यांनी सोसायटी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

‘ती’ काळ रात्र आणि मदतीसाठी धावले यशवंतराव चव्हाण…

तांबव्यात सोसायटीच्या वादातून आण्णा बाळा पाटील यांच्यासाठी ती एक काळरात्रच ठरली. सोसायटीच्या वादातून विष्णु बाळा यांच्या भावाचा म्हणजेच अण्णाचा संध्याकाळच्या अंधारात पाणवठ्यावर पाय तोडण्यात आला. जखमी आण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आले. पण घटना अतिशय भयानक आणि महत्वाची असल्यामुळे सातारला पाठवण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी दवाखान्यात गंभीर जखमी असलेल्या अण्णांना यशवंतराव चव्हाण भेटायला आले. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आण्णा बाळाच्या पाठीवरुन हात फिरवला आणि सांगितले “तुम्ही काही काळजी करू नका. मी डॉक्टरांना सांगितले आहे कि हा माझा माणूस आहे त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार करावेत,” तेव्हा आण्णा बाळा पाटील यांच्या मदतीसाठी स्वतः यशवंतराव चव्हाण धावून आले.

असे आले यशवंतरावामुळे विष्णुबाळा पोलिसांना शरण

महिना, दोन महिने, तीन महिने, सहा महिने उलटले पण विष्णु बाळा यांचा पत्ता लागत नव्हता. त्याकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कराडचेच असल्यामुळे शिवाय विष्णु बाळा यांचे बंधु आण्णा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख होती. राजकीय वातावरणात विष्णू बाळा पाटील यांनी केलेल्या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी आण्णांशी चर्चा केली. त्यानंतर विष्णु बाळा यांच्या कानावर यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या गोष्टी आण्णांनी घातल्या. विष्णू बाळा यांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले.

पोलिसांकडून विष्णू बाळांच्या नावे एक हजार रुपयांच बक्षीस जाहीर

जवळपास चार वर्ष शोधमोहिम चालु होती. अखेरीस पोलिसांनी वैतागुन साधारण 1958 साली विष्णु बाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव-ठिकाणा संगणाऱ्यास एक हजार रुपयांच बक्षीस जाहीर केलं. “जाहीर विनंती, 1000 रु. बक्षीस सर्व लोकांना कळवण्यात येते की वरील फोटोतील विष्णुबाळा पाटील राहणार तांबवे ता. कराड जिल्हा उत्तर सातारा हा इसम 1954 सालापासून फरारी असून त्याने आत्तापावेतो चार खून केलेले आहेत. तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून सहा महिन्यांचे अवधीत जे कोणी सदरहू फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती देतील, अगर पकडून देतील त्यांना रोख 1000 चे बक्षीस देण्याचे मेहेरबान इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर केले आहे. तरी सदर फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती अगर पकडून देऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यास तमाम जनतेस विनंती आहे,” असे जाहिरातीमध्ये लिहले होते.