कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी धरणातील पाण्याचा वापर कमी करावा, असे लेखी पत्र कोयना प्रकल्पाने महानिर्मिती कंपनीला दिले आहे.

सुमारे 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्या 13.75 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठ्याचे वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पाणी वाटपाचे तांत्रिक वर्ष 1 जूनपासून सुरू झाले आहे. या तांत्रिक वर्षात पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित झाला आहे.

पहिल्या 6 दिवसांतच महानिर्मिती कंपनीने 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून धरणात पाण्याचा खडखडाट केला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केल्यामुळे धरणातील पाण्यावरून सिंचन व वीज प्रकल्पात कमतरता भासत आहे. कोयना प्रकल्पाने महानिर्मिती कंपनीला वीजनिर्मितीसाठी कमी प्रमाणात पाणीसाठा वापरावा, असे लेखी पत्र महानिर्मिती कंपनीला दिले आहे.