एसटी स्थाकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ आणि महिला बचत गटाचे स्टॉलही ; गोगवलेंचे धडाकेबाज निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यापूर्वी विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे ई बसमध्ये देखील व्यवस्थापन परिचारिका असतील असे मंत्री नितीन गडकरी यांनी एका भाषणादरम्यान म्हंटले होते. मात्र आता गडकरींचे हे भाकीत लवकरच खरे होणार आहे असे दिसते आहे. कारण महाराष्ट्र एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नाही तर आणखी दोन महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले असून यामुळे महिला बचत गटांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया…

भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली 304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

बसस्थानकावर आनंद आरोग्य केंद्र

  • आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एसटीच्या 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.
  • माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार.
  • ही सेवा देण्याकरिता संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार.
  • संबंधित संस्था आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देऊ शकते.

स्थानिक महिला बचत गटांचे स्टॉल

  • प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा देण्यात येणार आहे.
  • या ठिकाणी परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करता येणार आहेत.
  • यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.
  • तसेच या स्टॉलसाठी 10 बाय 10 आकाराची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • बस स्थाकांवर बऱ्यापैकी नागरिकांची वर्दळ असते.त्यामुळे याचा फायदा बचत गटांना होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.