सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप सुरु झाले असून आज बहुतांश शिधा वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा पुणे विभाग यांनी दिली. जिल्ह्यात एकूण 3 लाख 87 हजार 441 आनंदाचा शिधा किट प्राप्त झाले आहेत. शासकीय गोदामांमधून सदर किट रास्तभाव दुकांनामध्ये वितरित करण्यात आले आहेत. या कीटमध्ये प्रत्येकी 1 कि. रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अंत्योदन अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयात हे किट वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरु झाले असून, उपायुक्त पुरवठा पुणे व जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या हस्ते आनंदाचा शिधा या संचाची निवडक लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानदरांकडे मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. शिधापत्रिकाधारकांना त्यांचे धान्य वितरित झाल्यानंतर ताबडतोब मोबाईल संदेशाच्या माध्यमातून धान्य वितरणाची माहिती देण्याच्या उद्देशाने मोबाईल क्रमांक पॉस मशिनशी जोडण्यात येत आहेत. या बाबत जिल्ह्यात आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.
शिधा वितरणात पारदर्शकता आणण्याच्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. ज्या प्रमाणे एटीएममधून पैसे काढल्यानंतर ताबडतोब मोबाईलवर संदेश येतो त्याचप्रमाणे शिधा वितरण झाल्यानंतर पॉस मशिनवरुन संबंधितांना मोबाईल संदेश पाठविण्यात येईल. यासाठी शिधापत्रिकेमधील नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल क्रमांक आरसीएमएस सिस्टीममध्ये घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या जवळच्या रास्त भाव दुकानदाराकडे नोंदवावे असे आवाहन त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा पुणे विभाग यांनी केले आहे.