कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, हम सब एक है, मदतनिसांच्या मानधनात वाढ करा यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जयसिंगपूर शहरातील प्रमुख मार्गावरुन घोषणा देत राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन नामदार यड्रावकर यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सप्टेंबर २०१८ मध्ये मानधनवाढ जाहीर केली आहे. मात्र, अद्याप त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. अंगणवाडी सेविकांना मोबाईलवरुन अहवाल भरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या महिलांच्यावर दबाव आला आहे. त्यामुळे तात्काळ मानधनवाढ द्या अशी मागणी महिलांनी केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या दोन महिन्यापासून मानधन दिले गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या महिलांनी जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात शनिवारी दुपारी २ च्या सुमारास एकत्र येत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शहरातून महिलांचा आवाज दणदणला होता.
अंगणवाडी महिलांना दिलेली भाऊबीज शिमगा आला तरी दिला जात नाही. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या गैरसोयीमुळे अंगणवाडी शिक्षिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन एक सांगत आहे आणि प्रशासन एक सांगत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांची आर्थिक कोंडी होत असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.आप्पा पाटील यांनी व्यक्त केलं.
शिरोळ तालुक्यात सहा अंगणवाडी सेविका मयत झाल्या असून त्यांचा चार वर्षापासून थकीत फंडही शासनाने दिला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत अन्यथा सर्व मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू असं पाटील पुढं बोलताना म्हणाले. यावेळी जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, विद्या कांबळे, मंगल माळी, शर्मिला दुधाळे, रुस्काना नदाफ, शमा नदाफ यांच्यासह तालुक्यातील शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.