अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना 75 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बुधवारी, मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. हा लाभ देताना 30 एप्रिल 2024 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि शासनामार्फत देण्यात येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल अशी आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, मध्यंतरीच मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. याबाबत विधानसभेमध्ये बोलताना देखील शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे अजित पवार यांनी म्हटले होते.