नवी दिल्ली वृत्तसंस्था : १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची ED ने नागपूरमध्ये रात्री उशिरा गुप्त चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईहून ईडीचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या तीन जणांची रात्री उशिरापर्यंत गुप्त चौकशी केली. यात कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल, सीए सुधीर बाहेती आणि सीए भाविक पंजवाणी या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांकडून काही महत्वपूर्ण कागद पत्र ईडीच्या पथकांनी सोबत नेल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
100 कोटी वसुली प्रकरणात या आधी 25 मे देखील ईडीने सागर भटेवार, समित आयझॅक व जोहर कादरी या अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांची चौकशी केली होती. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला होता.