जेलमधून सुटका होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला खोट्या आरोपांमध्ये…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आर्थर रोड तुरुंगातुन सुटका होताच दिली.

तब्बल १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी अनिल देशमुख यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वाझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे.

मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वाझेला अटक झाली आहे. तीनवेळा त्याला निलंबित करण्यात आले आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेही म्हटले,” असे अनिल देशमुख यांनी म्हंटले.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वझेकडे गृहमंत्री असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने कारवाई केली आहे. देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. ही रक्कम डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत जप्त करण्यात आली असून ही रक्कम मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वझेमार्फत वसूल करण्यात आली होती.