Animal care | उन्हाळ्यात जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी अश्या प्रकारे घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Animal care यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झालेली आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा चढलेला आहे. या उष्णतेचा केवळ माणसालाच नाही, तर जनावरांना देखील त्रास होत आहे. जनावरांना उष्माघाताचा धोका देखील संभवत आहे. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये जनावरांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना गुळ आणि मिठाचे पाणी पाजावे. असा सल्ला पशु संवर्धन विभागाने दिलेला आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमान हे 33 अंश सेल्सिअस एवढे होते. तर एप्रिल महिन्यात हे तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत झालेले आहे. मागील काही दिवसापासून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

या उष्णतेचा (Animal care ) त्रास सगळ्या माणसांना तर होतच आहे. परंतु मुक्या जनावरांना देखील या उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागाने यासाठी माहिती देखील दिलेली आहे. म्हशींना जर पाण्यात डूबण्याची सवय असेल, तर त्यांना पाण्यात सोडावे. त्याचप्रमाणे पाणी पाजण्यासाठी हौद असेल, तर त्यात गूळ आणि मीठ टाकून काठीने ढवळावे. म्हणजे उन्हामुळे येणारा अशक्तपणा कमी होतो.

जनावरांच्या उष्माघाताची लक्षणे काय? | Animal care

  • जनावरे अस्वस्थ होतात तसेच त्यांची तहान आणि भूक मंदावते.
  • जनावरे हालचाल न करता एका जागी स्तब्ध बसून राहतात.
  • त्याचप्रमाणे आठ ते दहा तासानंतर अतिसार होण्याची देखील शक्यता असते.
  • श्वासोच्छ्वास वाढून थाप लागते.
  • डोळे लालसर होतात आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • गोठ्यात खेळती हवा असावी त्याचप्रमाणे अधून मधून पाण्याची फवारणी देखील करावी.
  • गोठ्याच्या छतावर पालापाचोळा, गवत टाकावे किंवा त्यावर पाणी शिंपडावे जेणेकरून गोठ्याचा परिसर थंड राहील.
  • म्हशींना पाण्यामध्ये डुबण्यासाठी न्यावे.
  • जनावरांना दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाणी पाजावे. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
  • तुम्ही जर जनावरे शेतात चरायला सोडत असाल, तर ते सकाळी 11:00 पर्यंत आणि दुपारी चार नंतर सोडावीत.
  • जनावरांना हिरवा चारा खायला द्यावा.