मुंबई । लॉकडाउनमधील काही निर्बंध शिथिल होत असतानाच अनलॉक ३ मध्ये देशभरातील सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी खुली करण्याची परवानगी मिळेल, अशी आशा सिंगल स्क्रीन थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालिकांना होती. अनलॉकच्या नव्या टप्प्यात सिनेमागृह सुरु करण्यात यावी असा सल्लादेखील माहिती व प्रसारण मंत्रालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. परंतु, जाहीर झालेल्या नियमावलीत सिनेमागृहं बंदच ठेवण्याचा पवित्रा राज्य आणि केंद्र सरकारनं घेतला आहे. परिणामी, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं याबाबत नाराजी दर्शवली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत दिले आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, प्रेक्षकांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत थिएटर मालक पुन्हा कार्यन्वित होण्यासाठी तयार होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीपासून ते प्रेक्षागृहाचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी त्यांनी केली होती. परंतु, आता सिनेमागृहातला चंदेरी पडदा पुन्हा उजळून निघण्यासाठी आणखी काही दिवस विलंब होणार आहे. अद्याप ‘अनलॉक ३’मध्ये सिनेमागृहं उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. याबाबत मल्टिप्लेसमालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. गुरुवारी, याबाबत एक पत्रक जाहीर करून ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’नं आपली नाराजी व्यक्त केली. सोबतच आता १५ ऑगस्टपर्यंत किंवा महिनाअखेरपर्यंत तरी सिनेमागृहं कार्यन्वित होण्याची परवानगी द्यावी अशी आशा ते बाळगून आहेत.
कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न
सिनेमागृहांनी संसर्गापासून सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व पूर्वतयारी केली आहे. तसेच देशभरातील सिनेमागृहांच्या कार्यप्रणालीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं किमान एखादी तारीख जाहीर करावी अशी सिनेमागृहमालकांची मागणी आहे. कार्निव्हल सिनेमाचे सीईओ मोहन उमरोतकर सांगतात, की ‘सिनेइंडस्ट्री आणि सिनेमागृह बंद असल्यामुळे आमच्याबरोबरच सरकारचंदेखील मोठं आर्थिक नुकसान होत आहे. सुमारे २० लाख लोक या क्षेत्राशी जोडलेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह सिनेमागृहांवर अवलंबून आहे. सध्या आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना पगार देत आहोत. परंतु, येणाऱ्या दिवसात जर व्यवसाय बंद राहिला, तर वेतनासाठीचं आर्थिक बळ कुठून उभं करायचं, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. सध्या हिंदी सिनेनिर्मातेदेखील त्यांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. त्याचा आर्थिक फटका सिनेमागृहांना बसतो आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लवकरात लवकर सिनेमागृहं उघडण्याचा निर्णय घ्यावा अशी इच्छा आहे. सोबतच त्यांनी किमान एखादी तारीख तरी जाहीर करावी.’
दिल्ली आणि देशभरातील मोठमोठ्या शहरांमधील परिस्थिती आता सुधारायला लागली आहे. येत्या पंधरा दिवसांनंतर देशभरातील इतर छोट्या-मोठ्या शहरांच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं दिसल्यास संपूर्ण देशातील सिनेमागृहं एकत्रित सुरू करण्यास परवानगी मिळेल अशी आशा आहे. किमान पन्नास टक्के क्षमतेच्या अटीवर ही परवानगी मिळू शकते असं वाटतं.
– राजकुमार मेहरोत्रा, सीईओ (डिलाइट सिनेप्लेक्स)
सिनेमागृहं सुरू करण्याची तारीख तरी सरकारनं येत्या १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करावी. जेणेकरून सिनेव्यावसायिकांना पुढील महिन्यासाठी तशी आखणी करता येईल. ऑगस्टच्या शेवटपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेमागृहं उघडल्यास पुढे दिवाळीच्या सणाला नवे मोठे चित्रपट थिएटरवर प्रदर्शित होण्यास पूरक वातावरण तयार होईल.
– गिरीश जोहर, ट्रेड अनॅलिस्ट
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”