पुण्यात पुन्हा हुंडाबळी ! नवविवाहित दीपाने संपवले जीवन, फक्त भांडी-फ्रीज न दिल्याने सुरु होता छळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एकीकडे पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्येचा धक्का अजून ताजा असतानाच, पुण्यातील हडपसर भागातून पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. केवळ हुंड्यात अपेक्षित भांडी, फ्रीज न दिल्याच्या कारणावरून २२ वर्षांच्या नवविवाहितेवर मानसिक छळ केला जात होता. अखेर या छळाला कंटाळून दीपाने आपल्या संसाराचा शेवट स्वतःच्या गळ्याला फास लावून केला.

दीपाचे पूर्ण नाव देवकी प्रसाद पुजारी उर्फ दीपा असून, तिच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुरु झाला छळ

18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बसव मंगल कार्यालयात दीपाचे विवाहसोहळा पार पडला. दीपाच्या घरच्यांनी पतीला चार तोळे सोने व सुमारे १० लाख रुपयांचा खर्च करत मानपानासहित लग्न लावून दिला. पण, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्याला पोहोचल्यावर भांडी, फ्रीज आणि इतर सामग्री न दिल्याबद्दल तिच्यावर तोंडी शिवीगाळ आणि मानसिक त्रास सुरु झाला.

दीपाने ही गोष्ट वडिलांना सांगून माहेरीही गेली. मात्र, सासऱ्याच्या समजुतीनंतर तिला परत पुण्याला पाठवण्यात आले. १८ मे रोजी दीपाने वडिलांना फोन करुन पुन्हा एकदा छळ होत असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा, सासरे चंद्रकांत, आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हुंडाबळीचे सत्र कधी थांबणार?

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच पुण्यातील हडपसर परिसरात घडलेले हे प्रकरण समाजातील स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आधुनिक काळातही हुंड्यासारख्या मागण्या आणि त्या पूर्ण न झाल्यास होणारे छळ हे काळीज हेलावून टाकणारे आहे.

समाजासाठी जागरूकतेचा इशारा

दीपासारख्या अनेक मुली आजही हुंड्याच्या जाचाखाली जगत आहेत. या घटनांवर फक्त वाईट वाटून न घेता, हुंडा विरोधी कायदे अधिक कडक आणि प्रभावीपणे राबवले गेले पाहिजेत. तसेच, समाजानेही हुंड्याविरोधात ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.