Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करत कौतुक केलं आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या विजयनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. या शाळेतील विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ शकतात याचा विचार करून शिक्षक बालाजी जाधव आणि शेशाबा नरळे यांनी शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम सुरु केले आहे. विजयनगर शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव आणि शेशाबा नरळे यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गातील 40 विद्यार्थ्याना जपानी भाषा शिकवली आहे.

नुकतेच या शाळेस स्मार्ट क्लासरुमचा सेट हा सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. महा पारेषण तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या या शाळेच्या डिजिटल क्लास रूमच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण प्राप्त होणार आहे. या शाळेतील डिजिटल क्लासरुमचे नुकतेच जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून अभिनंदनपर कौतुक केले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/230283826720633

उपमुख्यमंत्र्यांच्या कौतुकामुळे अधिक ऊर्जा मिळाली : बालाजी जाधव

आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लास रूमच्या माध्यमातून दिलेल्या शिक्षणाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या या कौतुकामुळे आम्हाला ग्रामीण भागात असून सुद्धा अशी शाबासकी मिळाली आहे. त्यामुळे आणखी अभिनव प्रयोग करण्याची दिशा आम्हाला मिळाली आहे. यापुढे आम्ही आता अधिक ऊर्जेने काम करू, असे विजयनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी हॅलो महाराष्ट्र शी बोलताना सांगीतले.

शाळेतील मुलं बोलतात जपानी भाषा

सातारा जिल्ह्यातील विजयनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं हे जपानी भाषा बोलत आहेत. शाळेतील आदर्श व उपक्रमशील शिक्षक बालाजी जाधव यांनी राबविलेल्या विविध उपक्रमामुळे आज विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहेत. त्यांनी मुलांना जपानी भाषा शिकवली आहे. शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले एकमेकांसोबत जपानी भाषेत संवादही साधत आहेत.

जपानी शिक्षक जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवतात…

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजयनगर हि सातत्याने आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नावारूपाला आली आहे. या जिल्हा अपरिषद शाळेस तीन महिन्या पूर्वी जपान येथील एका शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळातील शिक्षकांनी ३ तास विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिकवलेही. यावेळी शाळेतील मुलांनी स्वतः बनवलेल्या वारली कलेच्या स्वनिर्मित फ्रेम भेट देवून त्यांचे जपानी भाषेत स्वागत केले. त्यानंतर या शाळेत सुरु असणारे कौशल्य विकासाचे साबण निर्मिती, घड्याळ निर्मिती, खडू निर्मिती,वारली चित्रकला, पियानो वादन, टॅबलेटचे प्रात्यक्षिक,धनुर्विद्या याचे प्रात्यक्षिक जपानी पाहुण्यांना दाखवले. यावेळी हे पाहून जपान येथील तोमोनरी कुरोदा हे खूप आश्चर्य चकित झाले व सर्व त्यांनी नोंदी करून मोबाईलमध्ये शूट सुद्धा करून घेतले व मुलांना शाबासकी दिल्या.