दिवाळीत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! रमाई आवास योजनेतील 2 हजार घरकुलास मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दिवाळीमुहुर्तावर अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमाई आवास योजनेंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2 हजार 532 घरकुलास मंजुरी दिली आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुलास मंजुरी देण्याबाबत 30 ऑक्टोंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये 10 हजाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या 2 हजार 532 घरकुलास मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी रमाई व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना राबविली जात आहे. यापूर्वी काही अडचणींमुळे रमाई आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण झाले नव्हते. 2019-20 या वर्षांमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत 750 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील सर्व घरकुलांना मंजुरी मिळाली होती. पुढे 2021-22 या वर्षासाठी तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यातील फक्त एक हजार घरकुलांनाच मंजुरी देण्यात आली होती.

यानंतर 2022-23 या वर्षांमध्ये सरकारकडून घरकुला संबंधित कोणतेही उद्दिष्ट ठेवण्यात आले नाही. मात्र, यंदा 2023-24 साठी सरकारने तब्बल 10 हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातील फक्त 2 हजार 532 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे अनेकांना दिवाळीमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, घरकुला संबंधित पार पडलेल्या बैठकीत, सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा फायदा घेता यावा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आणि इतर प्रमूख मंडळी उपस्थित होते.

रमाई आवास योजना

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने रमाई आवास योजना राबवली जात आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, एससी, एसटी किंवा नव-बौद्ध वर्गातील सर्व नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर असावे. तसेच समाजात त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत व्हावी. गेल्या काही काळात या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आहे. मात्र कोरोना काळात सरकारला घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने रमाई आवास योजनेच्या कामाला गती देण्यास सुरुवात केली आहे.