औरंगाबाद | रोजगार हमी योजनेचे सहसचिव चि. नि. सूर्यवंशी यांनी चक्क औरंगाबादचे नावच बदलून टाकले आहे. २९ जुलै रोजी मराठवाड्यातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कामांची यादी पाठविण्यासाठी दिलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
सरकारी दस्तऐवजावर संभाजीनगर असा उल्लेख मुद्रित होऊन आल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये याविषयीची चर्चा आहे. जिल्ह्याचे नाव परस्पर संभाजीनगर असे करणाऱ्या सहसचिवांनी पत्रावर न वाचता सही केल्याचे यातून दिसत आहे. हे पत्र तयार करताना त्यांनी कुणाची मंजुरी घेतली होती, की परस्पर हा कारभार केला, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत २९ जुलै रोजी रोहयो सहसचिव सूर्यवंशी यांनी एक पत्र बीड, लातूर, जालना, उस्मानाबाद, भंडारा, नागपूर, रायगड, नंदूरबार, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. या पत्रात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मजूर वाढविण्यासाठी कामनिहाय यादी पाठविण्याचा संदर्भ होता.
विधानपरिषद उपसभापती यांच्याकडे मार्च २०२० मध्ये झालेल्या बैठकीत वरील सर्व जिल्ह्यांतील प्रायोगिक तत्त्वावर मजूर वाढविण्यासाठी केलेल्या कामांची यादी मागविली होती.
अद्याप या जिल्ह्यांकडून ती माहिती पाठविली गेली नाही. याप्रकरणी लवकरच बैठक होणार असल्यामुळे माहिती तातडीने पाठविण्यासाठी सूर्यवंशी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. त्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.