अर्जुन खोतकर लवकरच शिंदे गटात येणार; सत्तारांचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का अशा चर्चा मागील आठवड्यापासून सुरु आहेत. अद्याप त्यांनी ठोक भूमिका घेतली नसली तरी आता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र खोतकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या सिल्लोड दौऱ्यात अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होणार आहेत अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. दिल्लीत आज एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे , अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली यावेळी सत्तार यांनी हा दावा केला.

सत्तार म्हणाले, खोतकर आणि आमचे पारिवारीक संबंध आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे. दोन्ही एकत्र आल्याने जालना मराठवाडाचा विकास करता येईल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. मात्र यावर अर्जुन खोतकर यांना विचारलं असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच मी एकनाथ शिंदे गटात जायचं की नाही, याचा निर्णय घेईन, असं वक्तव्य खोतकरांनी केलंय. काही दिवसांपूर्वीच खोतकरांनीही माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं. असा दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन, हे तुम्हीच सांगा असे खोतकर म्हणाले.

दरम्यान, अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जातात. त्यामुळे त्यांनी जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीच ४० आमदार आणि १२ खासदारांच्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता खोतकरही शिंदे गटात गेल्यास जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा झटका बसू शकतो.