सातारचे सुपुत्र जवान प्रशांत भोसले यांना मध्यप्रदेशात वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सैन्य दलात कार्यरत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळू गावचे सुपुत्र जवान प्रशांत भोसले (वय 38) यांना मध्यप्रदेश येथील सागर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. सैन्य दलाच्यावतीने उद्या (गुरुवारी) वेळू या गावी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील वेळू गावचे सुपुत्र असलेल्या प्रशांत मनोहर भोसले यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या प्रशांत भोसले यांच्या मनात देशसेवेची आस असल्याने कमी वयात ते सैन्य दलात दाखल झाले. अगदी मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या प्रशांत भोसले यांना मध्यप्रदेश राज्यात सागर येथे कर्तव्य बजावत असताना ह्रदय विकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.

जवान प्रशांत भोसले यांच्या निधनाची माहिती रात्री उशिरा वेळू गावातील ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबियांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. प्रशांत यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी, एक मुलगा, एक मुलगी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.