हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अहिं लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court) केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. येत्या 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे ईडीला (ED) मोठा झटका तर अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 21 मार्च रोजी दारु धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
सध्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळीच न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाने 1 जूनपर्यंत हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही एक जूननंतर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये म्हणून ईडीने प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला ईडीने तीव्र विरोध दर्शवला होता. याचबरोबर केजरीवाल यांना प्रचार करण्याचा मौलिक आणि संविधानिक अधिकार नसल्याचे ईडीने म्हटले होते. परंतु असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत.
दरम्यान, ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला होता. AAP च्या टीमने एक प्रेस रिलीज जारी करून माहिती दिली होती की, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमध्येच सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला आहे.