AAP कडून गुजरातचा मुख्यमंत्री कोण?? केजरीवाल यांनी जाहीर केलं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान गढवी यांना आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं आहे. अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

आम आदमी पक्षाकडून गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यासाठी केजरीवाल यांनी जन्मताच कौल मागितला होता. केजरीवाल यांनी लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक नंबर देखील जारी केला होता, ज्यावर लोक 3 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे गुरुवारी कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे त्यांचे मत देऊ शकत होते. त्यानुसार इसुदान गढवी हे आप कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रिपदासाठी इंद्रनील राज्यगुरू, मनोज सुर्थिया, गोपाल इटालिया, अल्पेश कथेरिया यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र अरविंद केजरीवाल यांनी जनतेने दिलेला कौल मान्य करत इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं आहे.

कोण आहेत इसुदान गढवी-

इसुदान गढवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील खेराजभाई हे शेतकरी असून संपूर्ण कुटुंबही शेतीत गुंतलेले आहे. इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकार देखील असून ते सुरुवातीपासूनच गुजरातचे प्रश्न मांडत आहेत. जून 2021 मध्ये ते ‘आप’मध्ये सामील झाले होते. इसुदान गढवी हे सध्या आपचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत