Wednesday, March 29, 2023

साताऱ्यात तब्बल 1 हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या सापडल्या

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला.

- Advertisement -

साताऱ्यात सापडलेला हा साठा लवकरच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सातारा येथील केसरकर पेठेतील नगरपालिकेची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी कमी पडू लागल्याने जिल्हा परिषदेसमोर नगरपालिकेच्या जागेत नवीन इमारतीचे काम सुरु केले आहे. याठिकाणच्या जागेची साफसफाई करुन सध्या जेसीबीच्या सहाय्याने पाया खोदण्याचे काम सुरु आहे.

खोदकाम सुरु असताना पुरातन काळातील रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला. काही क्षणातच घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली.  सातारा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ  घटनास्थळी दाखल झाले. पुरातत्व विभागालाही याबाबत कल्पना देण्यात आली. सध्या हा साठा पोलिसांच्या ताब्यात आहे. ब्रिटीश कालीन वस्तू सापडल्याने त्या पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.