एक, दोन लाख नव्हे तब्बल 1 कोटी 37 लाखांची मंदिरासाठी देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी गावाने दिवाळीत राज्याला आदर्शदायी एकीचा संदेश दिला आहे. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प गावातील सर्वच ग्रामस्थांनी राजकारण विरहित एकत्र येऊन केला. केवळ संकल्प नव्हे तर पहिल्याच बैठकीत तब्बल एक, दोन लाख नव्हे एक कोटी 37 लाख 240 रूपये देणगी जमविली.

श्री. भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धारासाठी खेड येथे गावात ग्रामस्थांची बैठक पाडव्याच्या मुहूर्तावर झाली. या बैठकीत तब्बल एक कोटी 37 लाख 240 रुपयांची देणगी जमा झाली. खेड ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन श्री. भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि शाळेच्या खोल्या बांधण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यादृष्टीने पहिली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यातच भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणावर झाली होती. त्यामध्ये सर्वांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून श्री. भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची शपथ ग्रहण केली होती.

बुधवारी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. खेड नांदगिरी, बर्गेवाडी, गणेश स्थळ व चंचळी येथील ग्रामस्थ व भाविक भक्तांची बैठक झाली. त्यामध्ये श्री. भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धाराचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला. सुमारे सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून देणगी संकलनास सुरुवात होत असल्याचे जाहीर करण्यात आले. अन् एक, दोन लाख नव्हे तर तब्बल एक कोटी 37 लाख 240 रुपयांची देणगी जमा देखील झाली.