पुणे | सुनिल कमल
सिनेसंगीताच्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वयम संस्थेतर्फे नेहमी वैविध्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही आशा भोसले यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये ८६ गाण्यांचा समावेश असून तीन दिवस हा कार्यक्रम असणार आहे. यात मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि इतर गायक-गायिकांबरोबर गायलेल्या गाण्यांचा समावेश असेल अशी माहिती पत्रकार परिषदेत निवृत्त कर्नल विवेक निक्ते यांनी दिली.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून दिनांक ७,८ व ९ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते ८ या वेळेत एस.एम्.जोशी सभागृह येथे होणार आहे.
महोत्सवाच्या समारोपाला एक दानपेटी फिरवण्यात येणार असून जमलेला निधी पुण्यातील डॉ अभिजीत सोनवणे यांच्या ट्रस्टला सुपुर्द करण्यात येणार आहे. सोनावणे हे गेली अनेक वर्षे पुण्यातील विविध भागातील भिक्षेकरींवर मोफत औषधोपचार करत असतात त्यांना भिक मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी कार्य करतात.