हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2025) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकऱ्यांचा ओघ बघता रेल्वे, बसेस ची सोय शासनाकडून दरवर्षी केली जाते. यंदाही महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून पंढरपूर साठी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. एकीकडे पश्चिम महारष्ट्र आणि मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहेच, परंतु दुसरीकडे विदर्भातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विठुरायाचे भक्त पंढरीला येत असतात. या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष एसटी बस चालवण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, नागपूर विभागातून तब्बल ६५ विशेष एसटी बस पंढरपूरला धावणार आहेत.
आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2025) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची अनेकदा खासगी ट्रॅव्हल्सकडून आर्थिक फसवणूक केली जाते. भाविकांकडून अव्वाचे-सव्वा भाडे वसूल केले जाते. असे प्रकार कमी करण्यासाठी नागपुरातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बसेस २ जुलै २०२५ ते दि.१३ जुलै २०२५ दरम्यान नागपूर ते पंढरपूर मार्गावर धावतील. भाविकांची संख्या आणि मागणी वाढल्यास आणखी बसेस उपलब्ध करण्यात येतील असेही एसटी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
कोणत्या आगारातून किती बसेस सोडल्या जातील? Ashadhi Ekadashi 2025
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील घाटरोड आणि गणेशपेठमधून प्रत्येकी 13 बसेस सोडल्या जाणार आहेत. उमरेडमधून 5, काटोलमधून 7, रामटेक व सावनेरमधून प्रत्येकी 7, इमामवाडा आगारातून 6 आणि वर्धमाननगरहून 7 बसेस सोडण्यात येणार आहेत. खरं तर मागच्या वर्षी आषाढी एकादशी मध्ये नागपूर मधून फक्त 40 विशेष एसटी बसेस पंढरपूरला सोडण्यात आल्या होत्या, यंदा मात्र या आकड्यात वाढ करत तब्बल ६५ बसेस पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील विठुरायाच्या भक्तांना नक्कीच दिलासा मिळेल. त्यांना जास्तीचे पैसे द्यावे तर लागणार नाहीच, उलट आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल.




