Ashadhi Ekadashi 2023 : साताऱ्यातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी 108 बसेसची सोय; कोणत्या आगारातून किती बस धावणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभरातील वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. लाखोंच्या संख्येनं वारकरी पायवारीमध्ये सहभागी होत विठ्ठलाप्रति आपली भक्ती व्यक्त करत आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात 18 जून रोजी आगमन होणार असून जिल्ह्यात पाच दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने 108 ज्यादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

कोणत्या आगारातून किती बसेस धावणार-

वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता विविध मार्गांवरील जागा बसेस सोडण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्याचा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड या ठिकाणी मुक्काम असणार आहे. सातारा आगारातून 17, कराड 14, कोरेगाव 9, फलटण 20, पाटण 5 दहिवडी 7, महाबळेश्वर 6, मेढा 5 पारगाव खंडाळा 9 आणि वडूज आगारातून 8 अशा मिळून 108 बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत.

कधी आहे आषाढी एकादशी?

महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. यंदाची आषाढी एकादशी महाराष्ट्रसह देशभरात २९ जून २०२३ रोजी गुरुवारी साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशीला २९ जूनला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होणार असून समाप्ती ३० जून पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाच्या भक्तीत लिन होतात. वारकरी विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.